दौंड, (पुणे) : बांधकाम सुरु असलेल्या घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून घरातील महागडे पाण्याचे नळ, वायर, मोबाईल चोरून घेऊन गेलेल्या चारपैकी तिघांना दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. राहुल नागेश गायकवाड (रा. भिमनगर, दौंड) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. तर यातील दोन अल्पवयीन मुलांना समज देऊन सोडून देण्यात आले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ७० हजार रुपयाच्या वस्तू जप्त केल्या आहेत.
दौंडचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. ०८) दौंड शहरातील स्टेट बँकेच्या पाठीमागे बांधकाम सुरु असलेल्या घराची घरफोडी करून त्यातील वस्तू चोरी झाल्या होत्या. याबाबत दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना एका गोपनीय बातमीदारामार्फत दौंड पोलिसांना माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड शहरातील सम्राटनगर परिसरात राहणाऱ्या राहुल गायकवाड यास ताब्यात घेतले. त्याकडे गुन्ह्याचा सखोल तपास केला असता, त्याने त्याचे मित्रांसोबत घरफोडी केल्याची कबुली दिली.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेल्या ७० हजार रुपयाच्या वस्तू जप्त केल्या आहेत. तसेच अल्पवयीन युवकांना ताब्यात घेऊन नातेवाईकांना समज देण्यात आली आहे. सदरची कामगिरी दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गुन्हे शोध पथकाचे पोलिस सुभाष राऊत, नितीन बोराडे, विजय पवार, शरद वारे, विशाल जावळे, आदेश राऊत, अमोल देवकाते आदींनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार किरण पांढरे करत आहेत.