लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर लोणी स्टेशन चौकात दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारणाऱ्या दुचाकी चालकासह वाहतूक शाखेच्या पोलिसाला एसटी बसच्या चालकाने आरेरावीची भाषा करून हुज्जत घातल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. सोमवारी (ता. 15) सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास लोणी स्टेशन चौकात ही घटना घडली आहे.
तसेच माझा भाऊ पीएसआय आहे, तू कशी तक्रार देतो बघतोच असे दुचाकी चालकाला म्हणत एसटी बस तब्बल अर्धा ते पाऊण तास रस्त्यातच उभी केली. तानाजी कैलास काते (वय – ३४, बार्शी डेपो) असे अरेरावीची भाषा करणाऱ्या चालकाचे नाव आहे. तर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सचिन शिवाजी कांबळे व ट्राफिक वार्डन सागर राऊत अशी दोघांशी हुज्जत घातलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तानाजी काते हा बार्शी डेपो येथे एसटी चालक आहे. तो सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास स्वारगेटवरून पुणे – सोलापूर महामार्गावरून बोरीवली – बार्शी ही बस घेऊन सोलापूरच्या दिशेने निघाला होता. यावेळी धनकवडी येथून धीरज राजेश भोसले व त्याचा एक मित्र हे याच रस्त्यावरून उरुळी कांचन येथे दुचाकीवरून निघाले होते.
कदमवाकवस्ती येथे आले असता चालक काते याने भोसले यांना महामार्गावर दोन ठिकाणी कट मारला. यावेळी भोसले यांनी लोणी स्टेशन या ठिकाणी पुढे येऊन एसटी बस थांबवली. यावेळी त्या ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सचिन कांबळे व सागर राऊत हे उपस्थित होते. यावेळी धीरज भोसले व काते यांची बाचाबाची सुरु झाली. यावेळी चौकात असलेल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दोघांमध्ये भांडणे का झाली? याची माहिती घेऊन मध्यस्थी केली. यावेळी काते याने कांबळे यांच्याशी हुज्जत घातली.
दरम्यान, भोसले यांनी मी पोलिसात तक्रार देतो, असे म्हणताच काते पोलिस व उपस्थित नागरिकांसमोर म्हणाला की, माझा भाऊ पीएसआय आहे, तू कशी तक्रार देतो बघतोच. तसेच पोलिसांशी हुज्जत घातली. यावेळी कांबळे यांनी लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस घटनास्थळी पोहचून चालक व एसटी बस पोलीस ठाण्यात घेऊन गेले आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरु आहे.
प्रवाशांना नाहक त्रास..
पुण्यावरून बार्शीच्या दिशेने निघालेल्या या एसटी बसमध्ये असलेल्या प्रवाशांना या वादाचा नाहक त्रास झाला असून त्या प्रवाशांना महामार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या बसने पाठविण्यात आले आहे. त्यामुळे या वादाचा प्रवाशांना भर उन्हात मोठा त्रास झाला आहे.