पुणे: पुणे काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. पक्ष बळकट करण्यासाठी हाय कमांडने पुणे शहरासाठी दोन स्वतंत्र शहराध्यक्षांची घोषणा केली होती. पक्षाचा हा फॉर्म्युला बळकट होण्याऐवजी वादाचे मुख्य कारण ठरला असून यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या नव्या नियुक्त्या जाहीर होताच पक्षातील मतभेद जाहीरपणे समोर आले.
नव्या रचनेनुसार पश्चिम पुण्याची धुरा माजी आमदार दीप्ती चौधरी यांच्याकडे, तर पूर्व पुण्याची जबाबदारी प्रशांत जगताप यांच्याकडे सोपवण्यात आली. परंतु, विद्यमान शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी तातडीने एकत्र येत शहराचा पूर्ण कारभार दीप्ती चौधरी यांच्या स्वाधीन केला. मात्र, नवनियुक्त अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन अध्यक्ष असताना एकाच नेत्याला झुकते माप का दिले? असे विचारले. यावरून आता स्थानिक पातळीवर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, दोन्ही नेत्यांचा अधिकृत पदग्रहण सोहळा होण्यापूर्वीच काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली. पक्षातील अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी ‘एक शहर, एकच अध्यक्ष’ अशी ठाम भूमिका घेतली आहे. दोन प्रमुख नेते असल्यास शहरात निर्णय घेताना अडचणी येतील, असा सूर या नेत्यांनी लावला आहे.







