लोणी काळभोर, ता. २३ : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता प्रकरणात लोणी काळभोर पोलिसांनी गेल्या दीड महिन्यांपासून सुरू ठेवलेली व्यापक शोधमोहीम आणि तपासाची धडपड पुन्हा चर्चेत आली आहे. शनिवारी पहाटे मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा इशारा देत पोलिसांवर गंभीर आरोप केले. मात्र, काही तासांतच त्यांनी व्हिडिओद्वारे पोलिसांची माफी मागत “गैरसमजातून आरोप झाले” असल्याचे स्पष्ट केल्याने संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे परिसरात “ही स्टंटबाजी तर नव्हे ना?” अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पाहा व्हिडीओ:
या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे, मुलगी बेपत्ता झाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ तीन स्वतंत्र तपास पथके तयार करून आरोपी समाधान उर्फ सुशील सूर्यवंशी याचा शोध सुरू केला होता. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, लातूर, नागपूर आणि सोलापूर अशा तब्बल आठ जिल्ह्यांत पोलिसांनी शोधमोहीम राबवली. आरोपी मोबाईल फोन वापरत नसल्याने तांत्रिक तपासात अडचणी निर्माण होत असल्या, तरी पोलिसांनी तपासाची गती मंदावू दिली नाही.
शनिवारी पहाटे मात्र या प्रकरणाने अचानक नाट्यमय वळण घेतले. मुलीच्या वडिलांनी अंगावर डिझेल ओतून घेत लोणी काळभोर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले. “आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे”, “माझ्या मुलीला न्याय मिळत नाही”, असे आरोप करत त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. तसेच काही पोलीस अधिकाऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करण्याची मागणीही केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.
मात्र, या संपूर्ण घटनेदरम्यान लोणी काळभोर पोलिसांनी दाखवलेला संयम आणि संवेदनशीलता विशेष ठरली. व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी आंदोलक वडिलांची समजूत काढताना, “आत चला, आपण व्यवस्थित चर्चा करूया,” अशी विनंती करताना दिसत होते. परिस्थिती चिघळू न देता पोलिसांनी अत्यंत शांततेने हाताळणी केली.
पाहा व्हिडीओ:
दरम्यान, सकाळी दहाच्या सुमारास मुलीच्या वडिलांनी दुसरा व्हिडिओ प्रसिद्ध करत स्वतःचा गैरसमज झाल्याचे मान्य केले. आरोपीच्या एका साथीदाराला पोलिसांनी पकडले होते; मात्र तो निसटल्याने आपण संतापलो होतो, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधिताला पुन्हा ताब्यात घेतल्याने आपला गैरसमज दूर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“लोणी काळभोर पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. पन्हाळे साहेब आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा प्रामाणिकपणे काम करत आहे. तणावाच्या परिस्थितीत माझ्याकडून काही गोष्टी घडल्या,” असे म्हणत त्यांनी पोलिसांवरील विश्वास व्यक्त केला.
या घटनेनंतर लोणी काळभोर पोलिसांच्या तपासपद्धतीची आणि संयमी भूमिकेची परिसरात चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर आरोपांचे वादळ उठत असताना पोलिसांनी कोणतीही आक्रमक भूमिका न घेता तपास सुरू ठेवला. त्यामुळे “पोलिसांवर झालेले आरोप कितपत योग्य होते?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पहाटे आत्मदहनाचा इशारा आणि काही तासांतच पोलिसांवरील विश्वास व्यक्त करत माफी मागितल्याने “ही स्टंटबाजी तर नव्हे ना?” अशी परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्क लावले जात असून आता पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







