लोणी काळभोर, ता. १० : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील थेऊर फाटा परिसरात भरधाव एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने २४ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता . ९) सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात तरुणाच्या पायावर बसचे मागील चाक गेल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून लोणी काळभोर पोलिसांनी एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शामराव कलप्पा घोडके (वय २४, रा. वरचामळा, सोरतापवाडी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एसटी चालक सचिन मारुती कात्रजकर (वय ३७, रा. घारगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोडके हे शेवाळवाडी येथील रॉयल एनफिल्ड शोरूममध्ये बिलिंग काउंटरवर काम करतात. ते त्यांच्या एमएच-१२-झेडएफ-२८२७ क्रमांकाच्या स्प्लेंडर दुचाकीवरून कामासाठी निघाले होते. कुंजीरवाडी येथील थेऊर फाटा पीएमटी बसथांब्याजवळ ते पोहोचले असता, सोलापूर-पुणे मार्गावरील आतील लेनमधून येणाऱ्या करमाळा-स्वारगेट एसटी बस (एमएच-१४-एलएक्स-७८७४) चालकाने कोणताही इंडिकेटर न देता अचानक बस डावीकडे घेतली. त्यामुळे बसची दुचाकीला जोरदार धडक बसली.
या धडकेत शामराव घोडके हे दुचाकीसह खाली पडले आणि त्यांच्या डाव्या पायावर एसटी बसचे मागील चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तत्काळ मदत करत रुग्णवाहिका बोलावून जखमी घोडके यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
यानंतर रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लोणी काळभोर पोलिसांनी चौकशी करून एसटी चालक सचिन मारुती कात्रजकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. त्यानुसार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ११९, १७७, १८४ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम १२५(ब), २८१ आणि ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.







