लोणी काळभोर, ता. १० : लग्नानंतर सासूची सेवा करण्यासाठी घाईघाईने विवाह लावून दिला, मात्र काही दिवसांतच हुंड्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी, सततचे टोमणे, मानसिक आणि शारीरिक छळ, गर्भपातासाठी दबाव आणि अखेर सात महिन्यांच्या गर्भवती अवस्थेत माहेरी पाठविण्यात आल्याची धक्कादायक घटना हवेली तालुक्यात उघडकीस आली आहे. दहा महिन्यांच्या मुलीसह माहेरी राहणाऱ्या एका २३ वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींविरोधात गंभीर आरोप करत कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.

समीक्षा प्रज्योत बांगर (वय २३, सध्या रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली, मूळ रा. बांगरवस्ती, केसनंद) यांनी थेऊर पोलीस चौकीत दिलेल्या फिर्यादीत हा धक्कादायक प्रकार उघड केला आहे. त्यानुसार पती प्रज्योत प्रकाश बांगर, सासरे प्रकाश पांडुरंग बांगर, नणंद प्राजक्ता निखील फरगडे आणि नणदोबा निखील फरगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीक्षा बांगर यांचा विवाह १६ मार्च २०२४ रोजी प्रज्योत प्रकाश बांगर यांच्यासोबत दोन्ही कुटुंबांच्या संमतीने झाला. लग्नासाठी वधूपित्याने चार तोळे सोने आणि संपूर्ण लग्नाचा खर्च उचलला होता. सासू कॅन्सरग्रस्त असल्याने घरातील जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी विवाह लवकर करण्यासाठी सासरच्या मंडळींकडून दबाव आणला जात होता. लग्नानंतर केसनंद येथील सासरी गेल्यानंतर सुरुवातीपासूनच सासू आणि नणंद टोमणे मारत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “तुझ्या आई-वडिलांनी काही दिले नाही, तुला आमच्या गळ्यात टाकले,” अशा शब्दांत वारंवार अपमान केला जात असल्याचे विवाहितेने म्हटले आहे.

फिर्यादी गरोदर असल्याची माहिती दिल्यानंतर पतीने “आईची सेवा करण्यासाठी तुला आणले आहे, आता बाळ नको,” असे सांगितले. त्यानंतर पती, सासू, सासरे आणि नणंद यांनी गर्भपात करण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मात्र, विवाहितेने त्यास नकार दिल्यानंतर तिचा छळ आणखी वाढल्याचे म्हटले आहे. माहेरहून पाच लाख रुपये आणून दे, अशी मागणी पती, सासरे, नणंद आणि नणदोबा वारंवार करत होते. गरोदर असतानाही घरातील सर्व कामे करून घेत मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सात महिन्यांची गर्भवती असताना झालेल्या वादानंतर नणदोबाने शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर ११ एप्रिल २०२५ रोजी पतीने पत्नीला माहेरी सोडले. “चार-पाच दिवसांत घेऊन जाईन,” असे सांगून गेलेले पती पुन्हा परतलेच नाहीत, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. १ जुलै २०२५ रोजी कुंजीरवाडी येथे विवाहितेने मुलीला जन्म दिला. मात्र, मुलीच्या जन्मानंतर पती किंवा सासरच्या मंडळींनी ना भेट दिली, ना विचारपूस केली, असा आरोप करण्यात आला आहे.
सध्या पीडिता आपल्या दहा महिन्यांच्या मुलीसह माहेरी राहत आहे. कौटुंबिक वाद मिटावा यासाठी ‘भरोसा सेल’मार्फत समुपदेशनाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पती प्रज्योत बांगर यांनी समुपदेशनास नकार देत पत्नी व मुलीकडे दुर्लक्ष केले आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात हुंड्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी, शिवीगाळ, मारहाण तसेच मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 115(1),3(5),352,85 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.







