आदित्य बोराटे

इंदापूर: इंदापूर शहराचे नगराध्यक्ष भरत शहा हे दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह काही माध्यमांमधून जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. मात्र, या सर्व अफवा पूर्णपणे खोट्या, निराधार आणि दिशाभूल करणाऱ्या असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत नगराध्यक्ष भरत शहा यांनी पक्षप्रवेशाच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

‘पुणे प्राईम’शी संवाद साधताना भरत शहा म्हणाले की, “मी आणि माझे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी पूर्णपणे एकनिष्ठ आहोत. दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमधून पसरवल्या जाणाऱ्या बातम्या या केवळ अफवा असून त्यामागे काही खोडसाळ प्रवृत्ती कार्यरत आहेत.”
ते पुढे म्हणाले की, काही व्यक्ती स्वतःचे राजकीय हितसंबंध साधण्यासाठी आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशाने अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत. आमची राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असला तरी अशा अफवांना आम्ही कोणतेही महत्त्व देत नाही. जनतेचा आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आमच्यावर असलेला विश्वास अधिक दृढ असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीशी, पक्षाच्या धोरणांशी आणि वरिष्ठ नेतृत्वाशी कायम निष्ठावान राहिलो आहोत. इंदापूर शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सातत्याने विकासकामे राबविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, इंदापूरकर नागरिक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही नगराध्यक्ष भरत शहा यांनी केले.
“आमची निष्ठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कालही होती, आजही आहे आणि भविष्यातही कायम राहणार आहे. आम्ही पक्षासोबत ठामपणे उभे असून इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्वीप्रमाणेच सातत्याने कार्यरत राहू,” असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.






