पुणे: पुण्यातील कोल्हेवाडी भागात एक मनाला चटका लावणारी दुर्देवी घटना घडली आहे. एका छोट्याशा वादामुळे झालेल्या भीषण अपघातात ३७ वर्षीय विठ्ठल भाऊराव जाधव यांचा नाहक जीव गेला आहे. खडकवासल्यात राहणारे विठ्ठल हे या घटनेचे बळी ठरले असून, या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी आता याप्रकरणी कडक पावले उचलत कारवाईला सुरुवात केली आहे.

२८ जूनच्या रात्री काही जण मद्यधुंद अवस्थेत असताना विठ्ठल जाधव यांच्याशी त्यांचा वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी विठ्ठल यांना थेट मुख्य रस्त्याच्या दिशेने जोरात ढकलले. ते रस्त्यावर पडले आणि त्याच वेळी तिथून अत्यंत वेगाने जाणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. कारचालकाला गाडीवर नियंत्रण मिळवता आले नाही, त्यामुळे विठ्ठल यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

नांदेड सिटी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासअंती सिद्धू शामराव धोत्रे (वय ३६) आणि गौरव आतिश काळभोर (वय ३२) या दोन संशयितांवर विठ्ठल जाधव यांना ढकलल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याशिवाय अपघातास कारणीभूत ठरलेल्या कारचालकावरही पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे.








