पुणे: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल या तरुणाची करण्यात आलेली हत्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. अत्यंत थंड डोक्याने आखलेल्या या कटात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन यांनी मिळून त्याला कड्यावरून ढकलून दिले. ज्या सियावर विश्वास ठेवून केतनने भविष्याची स्वप्ने पाहिली होती, तिनेच त्याला मृत्यूच्या दरीत लोटले, या घटनेने सर्वजण थक्क झाले आहेत.

सिया गोयल हिची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर ती एका अतिशय प्रतिष्ठित आणि धार्मिक कुटुंबातील मुलगी आहे. तिच्या पालकांना लग्नानंतर अनेक वर्षांनी मुलगी झाली होती, मुल होत नसल्यामुळे भावाच्या मुलाला दत्तक घेतले होते. त्यामुळे त्यांचे सियावर जिवापाड प्रेम होते. घरात सतत श्रीमद्भगवद्गीतेचे वाचन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जायचे. अशा सुसंस्कारी आणि शांत वातावरणात वाढलेली सिया इतकी क्रूर कशी होऊ शकते, याचे कोडे सर्वांना पडले आहे.

चौकशीतून असे समोर आले आहे की, सियाला व्यसनाची सवय जडली होती. ज्यामुळे नातेवाईकही तिच्यासोबत बोलत नव्हते. ती सतत पार्ट्या आणि चुकीच्या मित्र-मैत्रिणींच्या संगतीत होती. दरम्यान, अनेक नवस आणि मोठ्या प्रतिक्षेनंतर जन्मलेल्या या लाडक्या लेकीने केवळ स्वतःचे आयुष्यच उद्ध्वस्त केले नाही, तर समाजासमोर आदराने जगणाऱ्या आपल्या आई-वडिलांच्या प्रतिमाही मलीन केली आहे.






