पुणे: पुण्यातील लोहगड येथे घडलेल्या केतन अग्रवाल या युवा उद्योजकाच्या हत्येप्रकरणी आता अत्यंत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. मुख्य आरोपी सिया गोयल हिने या हत्येचा कट रचताना इंटरनेटचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. तिने हत्येपूर्वी गुगलवर ‘महिलांना पोलिस कोठडीत मारहाण होते का?’ असा प्रश्न सर्च केला होता. यावरून आरोपीने गुन्हा करण्यापूर्वीच कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी कशी पूर्वतयारी केली होती, हे दिसून येते. सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून 18 जून रोजी केतनला तब्बल 400 फूट खोल दरीत ढकलून निर्घृण हत्या केली होती.

तपासादरम्यान सियाच्या दोन मोबाइलमधील माहिती तपासल्यानंतर पोलिसांना धक्कादायक गोष्टी समजल्या. चेतनने आपल्या फोनमध्ये दोन वेगवेगळ्या सिम कार्डचा वापर करून सियासोबत सांकेतिक भाषेत चॅटिंग केले होते. विशेष म्हणजे, इंदूरमधील राजा रघुवंशी हत्येच्या प्रकरणाचा अभ्यास करून सियाने केतनच्या हत्येचा आराखडा तयार केला होता.

सध्या सिया आणि चेतन येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून, त्यांना 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस ताफ्यात असतानाही सियाच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चाताप दिसत नव्हता, उलट ती आक्षेपार्ह हावभाव करताना दिसली, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.








