पुणे: रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या साखरेच्या दराला आता काहीसा लगाम लागला आहे. अवघ्या एका आठवड्यात साखरेच्या दरात तब्बल १,५०० रुपयांची घसरण झाली असून, ६४ रुपये किलोपर्यंत पोहोचलेला दर आता सुमारे ४८ रुपये किलोवर आला आहे. त्यामुळे साखरेच्या बाजारातील तेजीला ब्रेक लागल्याचे चित्र आहे.

साखरेच्या दरात अचानक झालेल्या वाढीमुळे बाजारात साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, आता दरात झालेल्या घसरणीमुळे राज्यात तसेच देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्य साखर संघ आणि राष्ट्रीय साखर संघानेही साखरेची उपलब्धता पुरेशी असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, साखरेच्या दरवाढीमागील नेमके कारण शोधण्यासाठी साखर साठ्याची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातील साखर कारखाने, घाऊक व्यापारी, वितरक तसेच मोठ्या प्रमाणावर साखरेचा वापर करणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या साठ्याची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

या तपासणी मोहिमेदरम्यान संबंधितांकडे प्रत्यक्ष किती साखर उपलब्ध आहे, नियमानुसार साठा ठेवण्यात आला आहे का आणि दरवाढीसाठी कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे साखरेच्या बाजारातील हालचालींवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष राहणार आहे.
गेल्या काही दिवसांत किरकोळ बाजारात साखरेच्या दराने अचानक मोठी वाढ घेतल्याने त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरखर्चावर झाला होता. आता घाऊक बाजारातील दर कमी झाल्याने आगामी काळात किरकोळ बाजारातही त्याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे.
साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही दरात अचानक एवढी वाढ का झाली, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. विशेष साठा तपासणी मोहिमेतून या दरवाढीमागील नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेच्या दरातील ही घसरण ग्राहकांसाठी मोठा दिलासा मानली जात आहे.







