पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा गावात गुरुवारी रात्री एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. तरुण एका महिला आणि लहान मुलासोबत रस्त्याने जात असताना अचानक त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुण आपल्या सोबतच्या महिला आणि मुलासह पायी जात होता. त्याचवेळी मागून आलेल्या हल्लेखोराने अचानक त्याच्यावर हल्ला केला. त्याने धारदार चाकूने तरुणावर सलग वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण रस्त्यावर कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. महिला आणि लहान मुलाच्या समोर हा प्रकार घडल्याने दोघांनाही मोठा धक्का बसला.

हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनेची माहिती मिळताच काही स्थानिक नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. त्याचवेळी राजगड पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. नागरिक आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, महामार्गालगतच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या हल्ल्याची घटना कैद झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संबंधित फुटेज ताब्यात घेतले असून, त्याच्या आधारे तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण संबंधित महिलेला तिच्या मुलासह घेऊन आला होता. मात्र, या घटनेची माहिती महिलेच्या पतीला मिळाल्यानंतर तो त्यांचा पाठलाग करत घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर महिलेच्या समोरच पती आणि तिच्या प्रियकरामध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हल्ल्यात झाले. या घटनेत महिलेच्या पतीने प्रियकरावर जीवघेणा हल्ला केला. ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीची चौकशी सुरू आहे. हत्येमागील कारण आणि घटनेशी संबंधित इतर बाबी तपासानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.







