लोणी काळभोर, ता. 28 : आदर्शनगर परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला तरुणाने आपल्या तीन मित्रांसह फूस लावून घरातून घेऊन गेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित तरुणासह त्याच्या साथीदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीचे वडील हे रिक्षाचालक असून हे कुटुंबासह आदर्शनगर येथे राहत आहेत. यापूर्वी त्यांचे कुटुंब वानवडी परिसरातील वैदुवाडी येथे राहत होते. त्या वेळी त्यांच्या शेजारी रोहित उर्फ गुड्ड्या दिलीप माने (वय 21) हा राहत होता. त्याचे तरुणीच्या कुटुंबीयांच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. काही काळापूर्वी मुलीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्याने आईने विचारणा केली असता तिने पडल्यामुळे दुखापत झाल्याचे सांगितले. त्यानंतर मुलगी आणि रोहित यांच्यात मैत्री झाल्याने फिर्यादी यांनी वानवडीतील घर सोडले.

दरम्यान, आदर्शनगर येथे राहण्यास आल्यानंतर मुलीच्या आईच्या मोबाईलमध्ये मुलीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून रोहितशी संपर्क असल्याचे संदेश आढळले. याबाबत मुलीला विचारणा केली असता तिने कोणतीही माहिती दिली नसल्याचे वडिलांनी सांगितले. १५ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास मुलगी घरात नसल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. तिचा परिसरात शोध घेतला असता ती आढळून आली नाही. मुलीने आईचा मोबाईल फोन सोबत नेल्याचे समजल्यानंतर तिच्या क्रमांकावर फोन केला असता, रोहित व त्याचे तीन मित्र तिला घेण्यासाठी घराजवळ आले होते आणि ती त्यांच्यासोबत निघून गेल्याचे मुलीने सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मुलीने फोनवर आपण लोहगाव येथे असल्याचे सांगितले. तसेच रोहितसोबत जाणार नसून स्वतः निघून जात असल्याचेही तिने सांगितल्याचे वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. यानंतर मुलीला पोलिस चौकीत आणण्यात आले. अल्पवयीन असल्याने तिच्या इच्छेनुसार तिला सुधारगृहातील संस्थेत पाठविण्यात आले.आपल्या कायदेशीर रखवालीतील अल्पवयीन मुलीला रोहित उर्फ गुड्ड्या दिलीप माने याने फूस लावून घरातून घेऊन गेल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित तरुणाविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.







