पुणे: मार्केट यार्ड परिसरातील आनंदनगर वसाहतीत राहत्या घरातूनच अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या कारवाईत उघड झाला आहे. मार्केट यार्ड पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका घरावर छापा टाकला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन (MD), दारू आणि शस्त्रे जप्त करण्यात आली.

पोलिसांनी घराची झडती घेतली असता 125 ग्रॅम मेफेड्रॉन सापडले. या अमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारानुसार सुमारे 25 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय देशी-विदेशी दारूच्या बाटल्याही घरातून मिळाल्या. त्यांची किंमत सुमारे 10,400 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
घरात अमली पदार्थांच्या व्यवहारासाठी वापरला जाणारा इलेक्ट्रॉनिक वजनकाटाही आढळून आला. तसेच तलवार, कुऱ्हाड आणि काही रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारवाईत एकूण 25 लाख 18 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

या प्रकरणात पोलिसांनी ओम कुंडलीक गायकवाड (25) याला अटक केली आहे. त्याचा भाऊ यश कुंडलीक गायकवाड मात्र पोलिसांची कारवाई सुरू झाल्याचे लक्षात येताच तेथून निघून गेल्याचे सांगण्यात आले. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलिस हवालदार मेहबूब नदाफ यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. या अवैध धंद्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत जगताप, पोलिस निरीक्षक सुनिता नवले आणि पोलिस उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.







