पुणे : पतीच्या मोबाईलवर आक्षेपार्ह संदेश पाहून त्याबाबत विचारणा करणाऱ्या 39 वर्षीय विवाहितेचा सासरच्या मंडळींनी कथितरित्या छळ केल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. मोबाईलमधील मेसेजचा जाब विचारल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळींनी महिलेला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. याशिवाय लग्नानंतरपासून माहेरहून पैसे आणण्यासाठीही तिच्यावर दबाव टाकला जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सततच्या त्रासाला कंटाळलेल्या महिलेने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीनंतर लक्ष्मीनगर पोलिसांनी पतीसह सासरच्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतरपासूनच तिला आर्थिक कारणावरून त्रास दिला जात होता. माहेरहून पैसे आणावेत, यासाठी तिच्यावर वारंवार दबाव आणला जात होता. मागणी पूर्ण न झाल्यास तिच्याशी वाईट वर्तन केले जात असल्याचा आरोप तिने केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महिलेच्या पतीच्या मोबाईलमध्ये तिला अश्लील स्वरूपाचे चॅट्स आणि मेसेज आढळल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत तिने पतीकडे जाब विचारला. मात्र, या प्रश्नामुळे पती आणि सासरच्या मंडळींना राग आला. त्यानंतर महिलेला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
घडलेल्या प्रकारानंतर महिलेने लक्ष्मीनगर पोलिस ठाणे गाठून आपली तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणात विश्वजित विवेक खरात (39), विवेक काठोराम खरात (55), पूजा विवेक खरात (42), वैदेही विवेक खरात (28) आणि योगेश काठोराम खरात (52) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.







