अक्षय टेमगिरे

शिरूर: शिरूर तालुक्यातील करडे गावात घडलेल्या गोळीबार प्रकरणाचा अवघ्या ७२ तासांत उलगडा करून आरोपींना परजिल्ह्यातून जेरबंद करणाऱ्या शिरूर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने आणखी एक ठोस संदेश दिला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची करडे गावातून धिंड काढत घटनास्थळाची पाहणी करण्यात आली यावेळी आरोपींच्या तोंडी वेळोवेळी हाच शब्द ऐकायला येत होता की परत नाही करणार साहेब… चूक झाली…असे शब्द ऐकू येत होते. या कारवाईमुळे गावात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती.
पोलिसांच्या या कठोर आणि कायदेशीर कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. १८ जुलै रोजी मध्यरात्री करडे गावातील भैरवनाथ मंदिराजवळ जुन्या वादातून निखिल सतीश थेउरकर याच्यावर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
या घटनेने संपूर्ण शिरूर तालुका हादरला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तातडीने विशेष तपास पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यांच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने सुपा (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथून आरोपींना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले होते.
अथर्व उर्फ टिन्या शेळके, रोहन उर्फ दादया पंचमुख, आदित्य लंघे, निखिल कायस्थ आणि सनी मस्के यांच्यासह दोन विधीसंघर्षित बालकांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
अटकेनंतर पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना केली. त्यावेळी गावातून काढण्यात आलेल्या धिंडीदरम्यान आरोपींनी पोलिसांसमोर माफी मागत पुन्हा असा गुन्हा करणार नसल्याचे सांगितल्याचे उपस्थित नागरिकांनी पाहिले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांवर कायद्याचा धाक कायम असल्याचा ठोस संदेश समाजात गेला आहे.
पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि पीएसआय शुभम चव्हाण यांच्या धडाकेबाज तपासामुळे हे गंभीर प्रकरण अल्पावधीत उघडकीस आले शिरूर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने दाखविलेली तत्परता, तपास कौशल्य आणि समन्वयामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पीएसआय शुभम चव्हाण तसेच संपूर्ण डीबी पथकाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, गुन्हा करणाऱ्याला कायद्यापुढे झुकावेच लागते हा संदेश या कारवाईतून पुन्हा अधोरेखित झाला असून शिरूर पोलिसांवर सर्वत्र कौतुकाचा वर्ष होत आहे.







