पुणे : लोहगड हत्या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालच्या हत्येसाठी एका ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’शी संपर्क साधल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच, अटकेपूर्वी दोघांनी जवळपास दोन तास पोलिस चौकशीला सामोरे जाण्याविषयी मार्गदर्शन करणारे जपानी व्हिडिओ पाहिल्याचेही तपासातून उघड झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये संबंधित ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’ची भेट घेतली होती. मात्र, अग्रवाल कुटुंबाची पार्श्वभूमी समजल्यानंतर त्याने हे काम करण्यास नकार दिला. या भेटीचे हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, संबंधित व्यक्तीचा जबाब या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.

तपासादरम्यान आरोपींच्या ब्राउझिंग हिस्ट्रीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये अटकेपूर्वी दोघांनी सुमारे दोन तास जपानी व्हिडिओ पाहिल्याचे आढळून आले. पोलिसांच्या मते, या व्हिडिओंमध्ये चौकशीदरम्यान शांत कसे राहावे, देहबोलीवर नियंत्रण कसे ठेवावे आणि प्रश्नांना उत्तरे कशी द्यावीत, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. या संदर्भातील लिंक्सही आरोपींच्या ब्राउझिंग हिस्ट्रीमध्ये आढळल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.






