पुणे : नवले ब्रिज परिसरातील दोन लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई करत नऊ महिलांची सुटका केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे राकेश राजू पाटोळे (वय २७, रा. गणेशनगर, धायरी) आणि मंगेश व्यंकट बनसोडे (रा. गॅलेक्सी लॉज, आंबेगाव; मूळ रा. खेड, ता. लोहारा, जि. धाराशिव) अशी आहेत. ही कारवाई सोमवारी (दि. २०) आंबेगाव बुद्रुक येथील साई किरण लॉज आणि गॅलेक्सी लॉज येथे करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित लॉजमध्ये महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खातरजमा केली.
त्यानंतर दोन्ही लॉजवर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान वेश्या व्यवसायासाठी आणण्यात आलेल्या नऊ महिलांची सुटका करण्यात आली. तसेच रिक्षाचालक राकेश पाटोळे आणि लॉज व्यवस्थापक मंगेश बनसोडे यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ आणि त्यांच्या पथकाने केली.







