पुणे : ट्रिपलसीट दुचाकीस्वारावर कारवाईदरम्यान मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कोथरुड वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार राकेश दिलीप वायदंडे यांना निलंबित करण्यात आले आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी ही कारवाई केली.

राकेश वायदंडे हे २४ जून रोजी कोथरुड वाहतूक विभागात पेट्रोलिंग करत असताना देशपांडे पुरम लेन परिसरात ट्रिपलसीट दुचाकीस्वारांवर कारवाई करत होते. त्यावेळी संबंधित वाहनचालकाने पोलिसांनी हेल्मेट घातले नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या परवान्यासह इतर कागदपत्रांबाबत विचारणा केली होती.

या घटनेनंतर संबंधित वाहनचालकाने १६ जुलै २०२६ रोजी वायदंडे हे शासकीय गणवेशात वाहनचालकाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने चौकशी केली.
चौकशीत संबंधित पोलीस अंमलदाराचे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार आणि पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे असल्याचे निष्पन्न झाले. गंभीर गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी राकेश वायदंडे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.







