पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाने सुसज्ज १६० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, गुन्हेगारांची ओळख पटवणे, हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणे आणि गर्दीवर नियंत्रण ठेवणे यासाठी या स्मार्ट प्रणालीचा वापर केला जाणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकातून दररोज दीड लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. नव्याने बसविण्यात आलेल्या १६० कॅमेऱ्यांपैकी १९ कॅमेरे उच्च दर्जाच्या 4K रिझोल्यूशनचे आहेत. रेल्वे सुरक्षा दलाकडे (RPF) असलेल्या गुन्हेगारांच्या छायाचित्रांचा डेटाबेस या प्रणालीशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे वाँटेड व्यक्ती कॅमेऱ्यांच्या कक्षेत येताच आरपीएफच्या नियंत्रण कक्षाला स्वयंचलित अलर्ट मिळणार आहे.

हरवलेल्या व्यक्तीचे छायाचित्र प्रणालीमध्ये अपलोड केल्यानंतर ती व्यक्ती स्थानकातील कोणत्याही कॅमेऱ्यात दिसल्यास आरपीएफला तात्काळ सूचना मिळेल. तसेच पादचारी पूल किंवा इतर ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झाल्यास ही प्रणाली तत्काळ इशारा देऊन सुरक्षा यंत्रणेला सतर्क करेल.
सध्या पुणे रेल्वे स्थानकावर एकूण २३५ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. त्यापैकी १६० नवीन, तर ७५ जुने कॅमेरे आहेत. जुने कॅमेरे पुढील सहा महिन्यांत टप्प्याटप्प्याने हटविण्यात येणार आहेत.
या स्मार्ट कॅमेऱ्यांमध्ये नाईट व्हिजन, 4K रिझोल्यूशन, AI-आधारित विश्लेषण आणि फेस रेकग्निशनसारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे संशयित व्यक्तींची ओळख अधिक वेगाने आणि अचूकपणे पटवता येणार आहे.
पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी सांगितले की, “नवीन स्मार्ट सीसीटीव्ही प्रणालीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेत मोठी भर पडणार आहे. कोणतीही संशयास्पद किंवा धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित यंत्रणेला तात्काळ अलर्ट मिळून जलद प्रतिसाद देता येईल.”
पुणे मेट्रो स्थानक रेल्वे स्थानकाशी जोडले गेल्यानंतर प्रवाशांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन मुख्य प्रवेशद्वार, पादचारी पूल आणि महत्त्वाच्या ठिकाणी हे १६० स्मार्ट कॅमेरे २४ तास नजर ठेवणार आहेत.







