खुटबाव : खामगावातील (ता. दौंड) गाडीमोडी चौकात शनिवारी (ता. ३) दुपारी सव्वाचारच्या सुमारास तरुणावर कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. सूरज राहुल भुजबळ (रा. खामगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अमित जयवंत बहिरट असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीड वर्षापूर्वी सूरजची बहिण संजना आणि अमित यांचा प्रेमविवाह झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून दोघांचे पटत नसल्याने संजना मावशीकडे कुरकुंभ येथे राहत होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये वारंवार वाद होत असत. वाद मिटविण्यासाठी मध्यस्थांनी बैठक घेतली, त्यात अमितने घटस्फोट घेण्यासाठी पाच लाखांची मागणी केली होती. त्यामुळे संजनाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून अमितच्या मनात राग होता. अमितचा भाऊ समीर याने दोन दिवसांपूर्वी सूरजच्या आई सुवर्णा यांना दमदाटी केल्याचे समोर आले आहे.
सुरजचे गाडीमोडी चौकामध्ये कपड्यांचे दुकान आहे. शनिवारी दुपारी अमितने दुकानात सूरजवर वार केले. त्याला बाहेर फरफटत आणले. तेथेही त्याने त्याच्या मानेवर व शरीरावर वार केले. त्यात सूरजचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अमित स्वतःहून यवत पोलिस ठाण्यात हजर झाला. घटनेनंतर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ चौकामध्ये जमा झाले होते. पोलिसपाटील सुचिता जगताप यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.