शिरूर, दि. ३०: शिरूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त पथकाने तालुक्यात विविध ठिकाणी अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.या कारवाईत सुमारे २ लाख ८९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.

पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवारी (ता. २९) सायंकाळपासून संध्याकाळी उशिरापर्यंत विविध ठिकाणी एकच वेळी छापे टाकले.आलेगाव फाटा (ता.शिरूर) येथे विजय विश्वनाथ जाधव हा गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.यावेळी ४५० लिटर रसायन, ५ लिटर तयार दारू तसेच दारू निर्मितीची साधने असा २३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

त्यानंतर डोंगरगण परिसरातील घोडनदी किनारी संतोष जाधव याच्या गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून १ हजार २०० लिटर रसायन, ३५ लिटर तयार दारू, ५ लिटर ताडी व दारू निर्मितीचे साहित्य असा १ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.
नागरगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेश्मा संतोष चौगुले या महिलेच्या गावठी दारू अड्ड्यावर कारवाई करून ८०० लिटर रसायन व दारू निर्मितीचे साहित्य असा ४० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला.
याशिवाय न्हावरे येथे मंदाबाई शरद गव्हाणे या महिलेकडून १५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. तर शिरूर शहरातील ढोरआळी परिसरात मंगल भाऊसाहेब गव्हाणे यांच्याकडून ७ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.या दोन्ही कारवाईत संबंधित महिलांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या सर्व प्रकरणांमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून,पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल,अपर पोलीस अधीक्षक डॉ.शिवकुमार तसेच शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांनी ही कारवाई पार पाडली.
अवैध दारूधंदे,हातभट्ट्या व इतर बेकायदेशीर व्यवसायांविषयी माहिती असल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन शिरूर पोलिसांकडून करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जाणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.







