पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील (Shirur News) दहिवडी गावात 12 वर्षीय मुलाच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण परिसर (Shirur Crime) संतापाने पेटून उठला आहे. या घटनेने केवळ गावच नाही, तर संपूर्ण राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून ग्रामस्थांचा रोष उफाळून आला आहे. (Pune Crime)

या घटनेनंतर दहिवडी गावात शोक आणि संताप यांचे मिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. निष्पाप मुलाचा जीव गेल्याने ग्रामस्थ भावनिक झाले असून आरोपीला तात्काळ आणि कठोर शिक्षा व्हावी, अशी एकमुखी मागणी होत आहे. गावातील अनेकांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला असून, “अशा आरोपीला समाजात जागा नाही,” अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, याच आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारचा गुन्हा केल्याची माहिती समोर आल्यानंतर संताप आणखी वाढला आहे. “पहिल्याच गुन्ह्यानंतर कठोर कारवाई झाली असती, तर आज दुसऱ्या मुलाचा जीव गेला नसता,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, निष्काळजीपणाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

दहिवडी ग्रामपंचायतीनेही या प्रकरणात पुढाकार घेत प्रशासनाला लेखी निवेदन देत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. गावातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक कुटुंबांनी मुलांना एकटे बाहेर पाठवणे टाळण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवला आहे. आरोपीच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठीही विशेष खबरदारी घेतली जात आहे, कारण संतप्त जमावाचा रोष वाढण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांचा संताप पाहता, या प्रकरणात जलदगतीने आणि कठोर निर्णय घेण्याची अपेक्षा आता अधिक तीव्र झाली आहे.







