अक्षय टेमगिरे

शिरूर: शिरूर (Shirur News) शहरातील सरदार पेठ व हलवाई चौक परिसरात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या धाडसी चोरीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. अमोल ज्वेलर्स अँड सन्स प्रा. लि. या सोन्याच्या दुकानावर ४ ते ५ जणांच्या टोळीने दरोडा टाकत लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले आहेत.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कारमधून आलेल्या टोळीने अत्याधुनिक कटरच्या सहाय्याने दुकानाचे शटर उचकटले. त्यानंतर सुरक्षा ग्रील व काउंटरची काच फोडून दुकानात प्रवेश केला. सोने-चांदीचे दागिने व पैंजण असा ऐवज त्यांनी पळवला. या दरम्यान संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांना हालचालींचा संशय आल्याने त्यांनी आरडाओरडा केली. दुकानदार वैभव जोशी यांनी गॅलरीतून पाहणी केली असता दरोडेखोर दिसले. त्यांनी आवाज दिल्यावर टोळी कारमधून पळून गेली.
घटनेपूर्वी चोरट्यांनी परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे तोडले, काहींच्या वायरी कापल्या व काही वाकडे करून निष्क्रिय केले. यावरून चोरीची तयारी पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदेश केंजळे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली. पुणे ग्रामीण गुन्हे शाखा, रांजणगाव व शिरूर पोलीस पथकांनी संयुक्तपणे तपास सुरू केला आहे. अज्ञात चोरट्यांनी धाड टाकून तब्बल १ कोटी ३८ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,
७० किलो चांदीचे दागिने (पैंजन, तोडे, चैन, जोडवे आदी,किंमत सुमारे ६३ लाख रुपये)
७ किलो चांदीचे जोडवे – किंमत ७ लाख रुपये
२२ कॅरेट सोन्याचे कर्नफुले, चैन, अंगठ्या इ. ४६ ग्रॅम – किंमत ४.१४ लाख रुपये
गंठण, टेंपल हार, चैन, राणीहार, अंगठ्या आदी २२ कॅरेट सोन्याचे दागिने ७१४ ग्रॅम – किंमत ६४.२६ लाख रुपये, दरम्यान, एकूण मालाची किंमत १ कोटी ३८ लाख ४० हजार रुपये एवढी आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. हा गुन्हा शिरूरमधील सराफा व्यवसायिकांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण करणारा ठरला असून पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून तपास सुरु आहे.







