न्हावरे: कोकडेवाडी (ता. शिरूर) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील संजय बबन शितोळे यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने सन-२०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांची दुय्यम निबंधक (नोंदणी)या पदावर निवड झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे कोकडेवाडी, न्हावरेसह परिसरात शितोळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संजय शितोळे यांचे प्राथमिक शिक्षण कोकडेवाडी येथे झाले. त्यानंतर त्यांनी न्हावरे येथील श्री. मल्लिकार्जुन माध्यमिक विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतले. सन-१९९८ मध्ये याच विद्यालयातून त्यांनी दहावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर केडगाव (ता. दौंड) येथील जवाहर महाविद्यालयातून विज्ञान शाखेत बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातून कला शाखेची पदवी संपादन केली.

पदवीचे शिक्षण घेत असतानाच संजय शितोळे यांना स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण झाली. कोणत्याही मोठ्या सुविधा किंवा विशेष मार्गदर्शनावर अवलंबून न राहता त्यांनी घरीच अभ्यास करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळविण्याचा ध्यास घेतला. त्यांच्या या मेहनतीला सन-२००९-१० मध्ये यश मिळाले आणि आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक म्हणून त्यांची निवड झाली.

मात्र,एवढ्यावरच समाधान न मानता त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला. सन-२०१४ मध्ये त्यांनी तलाठी पदाची परीक्षा मेरिटमध्ये उत्तीर्ण केली. त्यानंतर ते आजतागायत हवेली तालुक्यात लोहगाव येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. नोकरी सांभाळत असतानाही अभ्यासाची जिद्द कायम ठेवत त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि सन-२०२५ मध्ये दुय्यम निबंधक(नोंदणी)पदावर निवड होण्याचे स्वप्न साकार केले.
संजय शितोळे यांच्या यशामागे त्यांची जिद्द, सातत्य, मेहनत आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी महत्त्वाची ठरली आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने शासकीय सेवेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत आता अधिकारी पदापर्यंत मजल मारल्याने त्यांच्या यशाची परिसरात विशेष चर्चा होत आहे.
संजय यांचे वडील बबन शितोळे हे प्रयोगशील शेतकरी असून परिसरात शेतीपंप दुरुस्तीचे कामही करत होते. कष्टकरी कुटुंबातून आलेल्या संजय शितोळे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे शितोळे कुटुंबीयांचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे.
संजय शितोळे यांच्या यशाने ‘परिस्थिती कोणतीही असो, जिद्द आणि सातत्य असेल तर यश निश्चित मिळते हा संदेश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.







