पुणे: कपडे खरेदीसाठी गेलेल्या एका महिलेच्या खासगीपणाचा भंग करून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना पुणे जिल्ह्यांतील कामशेत परिसरात उघडकीस आली आहे. विश्वासाने दुकानात जाणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कामशेत येथील “मुकेश फॅन्सी कॉर्नर” या दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी गेली होती. कपडे निवडून झाल्यानंतर, दुकानाचा मालक मुकेश मुथा याने तिला ते घालून पाहण्यासाठी (Trial) दुकानातील एका स्टोअर रूममध्ये पाठवले. मात्र, या नराधम दुकानदाराने त्या रूममध्ये आधीच चोरून सीसीटीव्ही कॅमेरा बसवला होता. या कॅमेऱ्याच्या सहाय्याने महिलेचे चित्रीकरण करण्यात आले.

आपल्यासोबत काहीतरी गैरप्रकार होत असल्याचे लक्षात येताच पीडितेने तत्काळ पोलीस ठाणे गाठले. कामशेत पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित कारवाई करत आरोपी मुकेश मुथा याला बेड्या ठोकल्या आहेत.







