नाशिक: स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात नावाच्या भोंदूबाबाचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे. आध्यात्मिक ऊर्जा आणि मनःशांतीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या या नराधमाविरुद्ध तक्रारींचा जणू पाऊस पडत आहे. नाशिक पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्पलाईनवर आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 11 पीडित महिलांनी धाडस दाखवून खरातच्या विरोधात लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी नोंदवल्या आहेत.
भय, दहशत आणि अंधश्रद्धेचा सापळा

अशोक खरात हा केवळ एक भोंदूबाबा नव्हता, तर तो एक अट्टल गुन्हेगार होता. महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तो जीवाचा धाक दाखवायचा. “तुझ्या पतीचा किंवा मुलाचा मृत्यू होईल,” अशी भीती घालून तो महिलांचे मानसिक खच्चीकरण करायचा. त्यानंतर ‘शरीरशांती’ आणि ‘पूजा’ करण्याच्या बहाण्याने तो त्यांचे शारीरिक शोषण करायचा. धक्कादायक बाब म्हणजे, अनेकींना दहशतीखाली ठेवून त्याने त्यांची हक्काची जमीन आणि मालमत्ता देखील लाटली आहे.
एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातच्या विरोधात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झाले असून, त्यात 8 गुन्हे महिला अत्याचाराचे तर 4 फसवणुकीचे आहेत. सायबर विभागाने खरातशी संबंधित तब्बल 4,650 अश्लील लिंक्स इंटरनेटवरून हटवल्या आहेत, तर सोशल मीडियावरील 450 संशयास्पद खाती कायमची बंद केली आहेत.
पोलीस आता खरातच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करणार आहेत, जेणेकरून अधिक तपास केला जाऊ शकतो. आगामी 60 दिवसांत या प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल होणार असून, ३० महत्त्वाच्या साक्षीदारांमुळे या नराधमाला कठोर शिक्षा मिळण्याची शक्यता आहे.







