इस्लामाबाद: मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याच्या दृष्टीने अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा ऐतिहासिक ‘युद्धविराम’ जाहीर झाला आहे. जग या निर्णयाचे स्वागत करत असतानाच, या प्रक्रियेत मध्यस्थीचा आव आणणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ एका ‘डिजिटल’ चुकीमुळे जागतिक स्तरावर ट्रोल होत आहेत. एका ट्विटमधील साध्या ‘ड्राफ्ट’ (Draft) या शब्दाने पाकिस्तानने स्वतः मध्यस्थी केली की कोणाच्या तरी इशाऱ्यावर, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
युद्धविरामाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वी शहबाज शरीफ यांनी ‘X’ (ट्विटर) वर एक पोस्ट केली होती. या पोस्टच्या सुरुवातीला चुकून “Draft – Message from the Prime Minister of Pakistan on X” अशी ओळ राहिली. नेटकऱ्यांच्या मते, हा मजकूर शरीफ यांच्या टीमने लिहिला नसून तो थेट अमेरिकेकडून किंवा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यालयाकडून ‘रेडीमेड’ आला होता, जो शरीफ यांनी जसाच्या तसा कॉपी-पेस्ट केला.

चूक लक्षात येताच पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाने (PMO) तातडीने ट्विट एडिट करून ‘ड्राफ्ट’ शब्द हटवला. पण तोपर्यंत या चुकीचे स्क्रीनशॉट्स जगभर व्हायरल झाले होते. “आपल्याच पंतप्रधानांसाठी मसुदा तयार करताना ‘पंतप्रधान, पाकिस्तान’ असे कोण लिहितो? ही तर अमेरिकेने दिलेली स्क्रिप्ट आहे,” अशा शब्दांत युजर्सनी शरीफ यांची फिरकी घेतली.
सामान्यतः कोणत्याही नेत्याची सोशल मीडिया टीम मजकूर तयार करताना कच्चा मसुदा (Draft) बनवते. मात्र, स्वतःच्याच पंतप्रधानांच्या संदेशात ‘पाकिस्तानचे पंतप्रधान’ असा औपचारिक उल्लेख असणे संशयास्पद मानले जात आहे. दरम्यान, पडद्यामागे नेमकं काय घडतंय? ते अद्याप समोर आलेले नाही.







