Loni Kalbhor लोणी काळभोर, ता. ९ : फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या गाडीतून तब्बल दोन लाख रुपयांहून अधिक रोकड चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) परिसरात घडली असून शुक्रवारी (ता.८) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातून फुलांच्या विक्रीचे पैसे घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या वाहनातील रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Loni Kalbhor

याप्रकरणी शहाजी ढवळे (वय ४०, व्यवसाय – शेती, रा. नायगाव, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाजी ढवळे हे मोगरा फुलांची शेती करतात. परिसरातील इतर शेतकऱ्यांची फुलेही ते स्वतःच्या वाहनातून गुलटेकडी मार्केट यार्डात विक्रीसाठी नेत असत. फुलांची विक्री झाल्यानंतर मिळणारे पैसे आणि पट्ट्या ते संबंधित शेतकऱ्यांना वाटप करत होते. Loni Kalbhor
७ मे रोजी दुपारी गुलटेकडी मार्केट येथील आडतदाराकडून एप्रिल महिन्यातील फुल विक्रीची पट्टी आणि तब्बल ३ लाख ५० हजार ४२ रुपये त्यांनी घेतले. दुपारी घरी आल्यानंतर त्यांनी ही रोकड घरातील कपाटात ठेवली आणि शेतातील कामासाठी निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी कुंजीर कॉम्प्लेक्स येथे परिसरातील शेतकरी फुले देण्यासाठी जमा झाले होते. त्यावेळी ढवळे यांनी अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या फुलांचे पैसे आणि पट्ट्या वाटप केल्या. काहींना हजारो रुपयांची रक्कम देऊनही अजून मोठी रक्कम वाहनात असल्याची त्यांना खात्री होती. Loni Kalbhor
दरम्यान, आणखी एका शेतकऱ्याला पैसे देण्यासाठी त्यांनी गाडीतील पैशांची पिशवी शोधली असता ती अचानक गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने गाडीखाली, परिसरात आणि आजूबाजूला शोध घेतला; मात्र पैशांची पिशवी मिळून आली नाही. त्यांच्या मारुती सुझुकी वॅगनआर (क्र. एमएच १२ जीएन २२८३) गाडीच्या डिकीत ठेवलेली तब्बल २ लाख २६ रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. विशेष म्हणजे ही रक्कम विविध शेतकऱ्यांच्या फुल विक्रीची असल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे कुंजीरवाडी आणि परिसरातील शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली असून, “दिवसाढवळ्या वाहनातून पैसे चोरीला जात असतील तर सुरक्षितता कुठे आहे?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. Loni Kalbhor







