उरुळी कांचन, (पुणे) : माहेरी आलेल्या एका 30 वर्षीय विवाहितेवर जुन्या भांडणाच्या वादातून अश्लील शिवीगाळ करत डोक्यात दगड घालून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्नील उर्फ निलब्या अंकुश खलसे टिंग्या लहू खलसे, व दिव्या लहू खलसे अशी मारहाण करणाऱ्या तिघांची नावे आहेत. तर नंदिनी विठ्ठल लोंढे (वय 30, रा. जावजीबुची वाडी, ता. दौंड) असे हल्ल्यात जखमी झालेल्या विवाहितेचे नाव असून, सध्या त्यांच्यावर उरुळी कांचन येथील श्री गणराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदिनी लोंढे यांच्या माहेरच्या लोकांचे त्यांच्या भावकीतील लहू खलसे यांच्या कुटुंबासोबत काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याच वादाच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नंदिनी या आपल्या चार वर्षांच्या मुलाला व बहिणीच्या मुलासोबत मोटारसायकलवरून पांढरस्थळ येथील आईच्या घरी गेल्या होत्या.

आईच्या घरासमोर पोहोचल्यावर तिथे बसलेले निलेश खलसे, स्वप्नील खलसे आणि दिव्या खलसे हे रस्त्याच्या बाजूला बसले होते. घरासमोर जाताना आरोपी निलेश खलसे याने विवाहितेला उद्देशून मोठ्याने व अश्लील भाषेत “आली धंद्यावाली वाडीवरून” असे म्हणून अपमानकारक उद्गार काढले. त्यावर नंदिनी यांनी, “माझा तुमच्या भांडणाशी काहीही संबंध नाही, तुम्ही मला शिवी का देता?” असे विचारले असता, निलेश खलसे याने हातात दगड घेऊन त्यांच्या डोक्याच्या पाठीमागे जोरदार प्रहार केला. यामध्ये त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला.
यानंतर इतर आरोपी स्वप्नील खलसे आणि टिंग्या खलसे यांनीही त्यांना शिवीगाळ करत हाताने, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. घटनेनंतर नंदिनी यांना त्यांच्या बहिणीच्या मुलाने तात्काळ उरुळी कांचन येथील श्री गणराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार गोसावी आणि महिला पोलीस नाईक क्षीरसागर करत आहेत.







