विशाल शिंदे

सातारा : खंडाळा तालुक्यातील राजेवाडी येथे 14 सप्टेंबर रोजी रस्त्याच्या कडेला आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाचा तपास सातारा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. पोलिसांच्या तपासात मृत महिला हर्षदा हणुमंत जाधव (वय 19, रा. जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द, हवेली, पुणे) असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात तिचे वडील हणुमंत दामोदर जाधव आणि चुलते बाळू अंकुश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

14 सप्टेंबर रोजी राजेवाडी येथे शिरवळ-राजेवाडी रस्त्यालगत सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी प्रकरणाचा सखोल तपास करून प्रथम मृतदेहाची ओळख पटविण्याच्या सूचना दिल्या.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने तब्बल 16 दिवस शिरवळ परिसरात तपास केला. घटनास्थळाची पाहणी, पुणे आणि भोरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, पेट्रोलिंग, गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचाही माग काढण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, हर्षदा ही व्यसनाच्या आहारी गेल्याचे, रात्रीच्या वेळी मुलांसोबत बाहेर फिरत असल्याचे आणि कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ करून त्रास देत असल्याचे आरोपींनी सांगितले. तसेच कुटुंबातील व्यक्तींना खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकीही ती देत असल्याचा आरोप आरोपींनी केला आहे. याच कारणावरून घरात वाद होत असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
तपासानुसार, हर्षदाला बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जायचे असल्याचे सांगून तिचे वडील आणि चुलते तिला वाहनातून घेऊन गेले. त्यानंतर तिच्या डोळ्यात आणि तोंडात चटणी टाकून हाताने तिचे तोंड व नाक दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर तिचा मृतदेह राजेवाडी परिसरात आणून टाकल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 238 आणि 61(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरवळ पोलीस करत आहेत. या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास करून मृतदेहाची ओळख पटवून गुन्ह्याचा उलगडा करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी अभिनंदन केले.






