पुणे, ता. 22 : मोहम्मदवाडी-काळे पडळ परिसरात डंपरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला तरुण गंभीर जखमी झाला. सोमवारी (ता. 21) सायंकाळी पाचच्या सुमारास रायहेजा व्हिस्टा येथील महादेव मंदिराजवळ हा अपघात झाला.

हमजा इब्राहिम सरकार असे मृत तरुणाचे नाव असून, वसीम खान हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर जखमी रस्त्यावर पडून असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, रुग्णवाहिकेला फोन केल्यानंतर ती सुमारे 50 मिनिटांनी घटनास्थळी पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, रुग्णवाहिका पोहोचण्याच्या वेळेबाबत अधिकृत पडताळणी सुरू आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास काळेपडळ पोलिसांकडून सुरू आहे.








