ऋषभ परदेशी

राशीन, ता. 23: राशीन येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर परिसरातील ड्रेनेज व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला असून, तुटलेल्या ड्रेनेजलाईन, तुंबलेले चेंबर आणि रस्त्यावर साचलेले सांडपाणी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा झाला की घरात स्वच्छ पाण्याऐवजी सांडपाणी शिरण्याची वेळ नागरिकांवर आली असून, काही घरांमध्ये हे घाण पाणी चक्क स्वयंपाकाच्या चुलीपर्यंत पोहोचत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

परिसरात सांडपाणी साचल्याने दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाल्याने प्रशासन आणखी किती दिवस डोळेझाक करणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

‘कर भरायचा आम्ही, सुविधा कोण देणार?’
एकीकडे नागरिकांना पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. तर पाणी आले की ड्रेनेज तुंबल्यामुळे घरात सांडपाणी घुसत असल्याने नागरिकांची अक्षरशः कोंडी झाली आहे. “कर आम्ही भरायचा, मात्र मूलभूत सुविधा देण्याची वेळ आली की प्रशासन गायब होते,” असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. परिसरात करण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामाच्या गुणवत्तेबाबतही नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित कामाची प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता तपासावी आणि कामात अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
जुना कुंभारगाव रोडही घाणीच्या विळख्यात
राशीनच्या जुना कुंभारगाव रोड परिसरातही ड्रेनेजलाईन आणि चेंबरची समस्या गंभीर झाली आहे. रस्त्यावर सांडपाणी साचल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, दुर्गंधीमुळे नागरिक आणि व्यापारी हैराण झाले आहेत. हा मार्ग बाजारपेठेकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी तातडीने स्वच्छता करून ड्रेनेजची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी होत आहे.
वारंवार तक्रारी; तरीही प्रशासन सुस्त?
माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक जंजिरे, तसेच अमोल जाधव, बापू उकिरडे, बाळासाहेब उकिरडे, बाबा उकिरडे यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी या समस्येबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्याचे सांगितले. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
‘काम करा, अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे!’
ड्रेनेजलाईनची तातडीने दुरुस्ती, तुंबलेली चेंबर साफ करणे, सांडपाण्याचा निचरा करणे, परिसराची स्वच्छता आणि पेव्हर ब्लॉकच्या कामाची गुणवत्ता तपासणे, या मागण्यांसाठी नागरिक आक्रमक झाले आहेत. प्रशासनाने तातडीने समस्या मार्गी न लावल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक जंजिरे व स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. ग्रामविकास अधिकारी रोहिदास कापरे यांच्या विरोधातही आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, घरात सांडपाणी, रस्त्यावर घाण, नाकात दुर्गंधी आणि आरोग्यावर संकट… राशीनकरांच्या या संतापाची प्रशासन किती दिवस परीक्षा घेणार? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.







