पुणे : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वेतून कोट्यवधी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा आणणाऱ्या एका महिलेला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने पुणे रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले. तिच्या बॅगेतून ३.४ किलोपेक्षा अधिक वजनाचे अॅम्पेटामाईन आणि एमडीएमए जप्त करण्यात आले असून, या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ३.४१ कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून संबंधित महिला पुण्याकडे रवाना झाली होती. तिच्याबाबत डीआरआयच्या मुंबई आणि पुणे पथकाला आधीच गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. मंगळवारी पहाटे ट्रेन पुणे रेल्वे स्थानकावर दाखल होताच महिला खाली उतरली. त्यानंतर पथकाने तिला ताब्यात घेत तिच्या सामानाची तपासणी केली.

बॅगेची सखोल झडती घेतल्यानंतर त्यामध्ये अमली पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. त्यात २ हजार ५३२ ग्रॅम वजनाचे अॅम्पेटामाईन सापडले. हा पदार्थ स्फटिकासारखा पांढरा-पिवळसर रंगाचा असल्याचे तपासात आढळले. याशिवाय ८७८ ग्रॅम वजनाच्या एमडीएमएच्या रंगीबेरंगी गोळ्याही जप्त करण्यात आल्या.

एकूण जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाचे वजन ३.४ किलोपेक्षा अधिक असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३.४१ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईनंतर संबंधित महिलेला ताब्यात घेण्यात आले असून तिच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पुण्यात नेमके कोणाला देण्यात येणार होते, याचा तपास आता डीआरआयकडून सुरू आहे. या प्रकरणामागे एखादे मोठे तस्करीचे जाळे कार्यरत आहे का, तसेच या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी काही संबंध आहेत का, याचाही तपास केला जात आहे. दिल्लीपासून पुण्यापर्यंत या अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी पथकाकडून पुढील चौकशी सुरू आहे.







