पुणे : देशासह महाराष्ट्रात मतदारांच्या नोंदींची विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रिया म्हणजेच SIR सुरू आहे. याच प्रक्रियेचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. मतदार ओळखपत्र बंद होईल, ते एक्स्पायर होणार आहे किंवा KYC अपडेट करणे आवश्यक आहे, अशा स्वरूपाचे फोन कॉल, एसएमएस आणि व्हॉट्सॲप संदेश पाठवून नागरिकांना जाळ्यात ओढले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा संदेशांमधील संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सायबर तज्ज्ञ निरंजन भुसनाळे यांच्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार फोन करून नागरिकांना मतदार ओळखपत्राचे पुन्हा व्हेरिफिकेशन करणे आवश्यक असल्याचे सांगतात. SIR प्रक्रिया पूर्ण केली नाही तर व्होटर आयडी निष्क्रिय होईल, अशी भीतीही दाखवली जाते. त्यानंतर KYC अपडेट किंवा SIR पडताळणीच्या नावाखाली लिंक पाठवून ती उघडण्यास सांगितले जाते.

या लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांना बनावट किंवा अनधिकृत अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले जाऊ शकते. अशा अॅप्सना अधिकृत प्ले स्टोअरवरही शोधता येत नाही. त्यामुळे एसएमएस, व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवरून आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये. तसेच ओटीपी, बँक खात्याची माहिती, कार्ड तपशील किंवा इतर वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

पुण्यातही अशाच प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. काही नागरिकांनी मतदार ओळखपत्र पडताळणीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना फोन करून प्रक्रियेसाठी शुल्क भरण्यास सांगितले गेले. सुरुवातीला कमी रकमेचे शुल्क मागून त्यानंतर बँक खात्याशी संबंधित माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत.
मतदार ओळखपत्र बंद होणार किंवा ते आपोआप रद्द होणार, अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. SIR किंवा मतदार यादीशी संबंधित कोणतीही प्रक्रिया केवळ अधिकृत माध्यमातूनच पूर्ण करावी. ऑनलाइन प्रक्रिया करताना संबंधित संकेतस्थळ निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे.
संशयास्पद कॉल, लिंक, संदेश किंवा अॅपच्या माध्यमातून मतदार पडताळणीची प्रक्रिया करण्यास सांगितल्यास नागरिकांनी तात्काळ सावध व्हावे. कोणतीही वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती देऊ नये आणि संबंधित अधिकृत यंत्रणेशी संपर्क साधावा. सायबर फसवणूक टाळण्यासाठी जागरूकता आणि अधिकृत डिजिटल माध्यमांचा वापर हाच सुरक्षित मार्ग असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.







