पुणे: सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना सावध राहण्याची गरज पुन्हा एकदा समोर आली आहे. पुण्यात एका तरुणाला मुलीच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार करून तब्बल दीड लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. विशेष म्हणजे आरोपी पुरुष असून तो फोनवर मुलीच्या आवाजात बोलत एका तरुणाला गंडा घातला आहे.

पर्वती परिसरात राहणाऱ्या कुणाल जितेंद्र अदमाने (वय 25) याने मुलीच्या नावाने Snapchat वर बनावट अकाउंट तयार केले होते. या अकाउंटवरून त्याने एका तरुणाशी मैत्री केली. सुरुवातीला दोघांमध्ये सामान्य गप्पा सुरू होत्या. तब्बल 7 महिने त्यांच्यात नियमित संवाद सुरू राहिला. या काळात आरोपीने समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन केला.

विश्वास निर्माण झाल्यानंतर कुणालने क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास मोठा फायदा आणि चांगला परतावा मिळू शकतो, असे सांगितले. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने 1 हजार 468 USDT म्हणजेच सुमारे दीड लाख रुपये क्रिप्टो वॉलेटमध्ये पाठवले.

रक्कम मिळाल्यानंतर मात्र परिस्थिती बदलली. गुंतवणुकीचा परतावा आणि पैसे परत करण्याबाबत तक्रारदाराने विचारणा केली असता संपर्क टाळला जाऊ लागला. काही दिवसांनी ‘प्रिन्सिका’ नावाचे Snapchat आणि Instagram अकाउंटही बंद करण्यात आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. दरम्यान, तपास करत सायबर पोलिसांनी कुणाल अदमाने याला अटक केली. आरोपी उच्चशिक्षित असून त्याने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.







