पुणे: पुण्यातील वडगाव शेरी, चंदननगर आणि मांजरी बुद्रुक परिसरात पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पसार होणाऱ्या दुचाकीस्वार चोरट्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. सलग चोरीच्या घटनांमुळे या भागात महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीपर्यंत पोहोचले.

अटक केलेल्या आरोपीचे नाव स्वप्नील सतीश आहेर (वय 28, रा. पापडे वस्ती, हडपसर) असे आहे. वडगाव शेरी, चंदननगर आणि मांजरी परिसरात महिलांच्या दागिन्यांची चोरी झाल्यानंतर चंदननगर आणि मांजरी पोलीस ठाण्यात संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

चोरट्याचा शोध घेताना पोलिसांनी परिसरातील 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग तपासले. विविध ठिकाणचे फुटेज जोडून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. अखेर स्वप्नील आहेर पोलिसांच्या हाती लागला.

चौकशीदरम्यान त्याने महिलांकडून हिसकावलेले सोन्याचे दागिने एका सराफाकडे विकल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे दागिने आणि गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 4 लाख 80 हजार रुपये आहे.
आरोपीच्या अटकेनंतर जबरी चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरोडा आणि वाहन चोरीविरोधी पथक 2 ने ही कारवाई केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास करून आरोपीला ताब्यात घेतले.






