इम्रान आत्तार

भोर: महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांचे आज पुण्यात निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय क्षेत्रात तसेच पुणे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

अनंतराव थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रिय नेते होते. ग्रामीण भागातील विकास, शेतकरी प्रश्न, शिक्षण, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने काम केले. भोर तालुक्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान मानले जाते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा जिव्हाळा आणि जनतेशी असलेला थेट संपर्क ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची वैशिष्ट्ये होती.







