पुणे: पुणे पोलिसांना अनेक महिन्यांपासून गुंगारा देणारा आणि कुख्यात घायवळ टोळीतील सक्रिय सदस्य सचिन घायवळ अखेर राजस्थानमधून पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. विशेष म्हणजे अटकेपासून बचाव करण्यासाठी त्याने आपली ओळख पूर्णपणे बदलली होती. नाव, राहणीमान आणि चेहरामोहराही बदलून तो राजस्थानातील सिकर जिल्ह्यात राहत होता. दाढी वाढवून आणि वेगळा वेश धारण करून तो सामान्य नागरिकाप्रमाणे वावरत असल्याने त्याला ओळखणेही अवघड झाले होते.

सचिन घायवळ हा कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ असून निलेशनंतर घायवळ टोळीतील प्रमुख सदस्य मानला जातो. त्याच्यावर खंडणी, हत्येचा प्रयत्न, धमकी देणे आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वारजे पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका प्रकरणात त्याच्यावर 44 लाख 36 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. कर्वेनगर आणि शिवणे परिसरातील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ व वाहतूक सेवा पुरवणाऱ्या एका खासगी कंपनीच्या महिला संचालिकेकडून ही खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पुणे जिल्हा, अहिल्यानगर आणि मराठवाडा परिसरात मोठी मोहीम राबवली होती. काही महिन्यांपूर्वी तो जामखेड परिसरातील ऊसाच्या शेतातून पोलिसांना चकवा देत पसार झाला होता. त्यानंतर तो राजस्थानात लपून राहत असल्याची माहिती मिळाली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सिकर जिल्ह्यातून त्याला ताब्यात घेतले.
सचिन घायवळ याचा आणखी एक वेगळा पैलूही समोर आला आहे. तो यापूर्वी पुण्यातील कर्वेनगर परिसरातील एका शाळेत व्हॉलीबॉल प्रशिक्षक म्हणून काम करत होता. मात्र त्याच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर शाळेने त्याची सेवा समाप्त केली होती.
दरम्यान, त्याचा भाऊ निलेश घायवळ अद्याप परदेशात फरार आहे. त्याचा पासपोर्ट आणि व्हिसा रद्द करण्यात आला असला तरी तो सध्या नेमका कोणत्या देशात आहे, याबाबत पोलिसांना ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र सचिनच्या अटकेमुळे घायवळ टोळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.







