पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत एका पतीने आपल्या पत्नीची लाकडी दांडक्याने मारहाण करून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे डोंगरगण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ही घटना शिरूर तालुक्यातील डोंगरगण येथील शिवनगर भागात घडली. मृत महिलेचे नाव शीतल तुकाराम काळे (वय 35, रा. शिनोली, ता. आंबेगाव) असे आहे. तर आरोपी पती तुकाराम हेमा काळे (वय 38) याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम आणि शीतल काळे हे दोघे काही दिवसांपूर्वी डोंगरगण परिसरात शेतमजुरीसाठी आले होते. तुकारामला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो अनेकदा पत्नीवर संशय घेत असे आणि त्यांच्यात वारंवार वाद होत होते. या वादातून तो शीतल यांना मारहाण करत होता.
रविवारी दुपारी पुन्हा एकदा पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर संतापलेल्या तुकारामने घरातील लाकडी दांडक्याने शीतल यांच्यावर जोरदार हल्ला केला. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कारवाई करत आरोपी तुकाराम काळे याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.







