मुंबई: भाईंदर परिसरात एका 4 वर्षीय मुलाच्या मृत्यूमागील धक्कादायक सत्य पोलिस तपासातून समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी काशिमीरा भागातील नाल्यात या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे मानले जात होते. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात हा प्रकार खुनाचा असल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुलाच्या शरीरावर संशयास्पद दुखापतींच्या खुणा आढळल्यानंतर तपासाची दिशा बदलली. त्यानंतर मुलाच्या आईसोबत राहत असलेल्या शंभू शर्मा उर्फ नेपाळी याची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीने दारूच्या नशेत मुलाला मारहाण केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. ही घटना घडल्यानंतर काही वेळाने मुलाची प्रकृती बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर घाबरलेल्या आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी मुलाचा मृतदेह नाल्यात टाकल्याचा आरोप आहे.
तपासात आणखी काही बाबी समोर आल्या आहेत. आरोपीला मुलाच्या उपस्थितीचा त्रास होत असल्याचे सांगितले जात आहे. मुलगा सतत रडत असल्याने आणि त्याच्यामुळे वैयक्तिक आयुष्यात अडथळे निर्माण होत असल्याची भावना आरोपीच्या मनात होती. याच कारणातून त्याने संतापाच्या भरात हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृत मुलगा, त्याची आई आणि आरोपी हे तिघेही आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होते. ते काशिमीरा परिसरात उड्डाणपुलाखाली वास्तव्यास असून कचरा गोळा करून उदरनिर्वाह करत होते.
घटनेनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून मृत्यूशी संबंधित सर्व पैलूंची सखोल चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.







