अजित जगताप
Satara News वडूज : हवामान विभागाने दिलेला अंदाज खरा ठरला. राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस बरसला. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. खटाव तालुक्यातील शेतकऱ्याचे गारपीट व पावसामुळे निर्यातीसाठी सज्ज झालेली द्राक्ष भुईसपाट झाली आहे.
शेतकऱ्यांना नुकसान…!
खटाव तालुक्यातील डांबेवाडी, शिंगाडवाडी यलमरवाडी, बोंबाळे, कलेढोण, मायणी आदी परिसरात अचानक दुपारी कोसळलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. वार्षिक यात्रेच्या आनंदात पावसाने व्यत्यय आणला असून शेतकऱ्यांना आता नुकसान सहन करावे लागत आहे.
डांबेवाडी येथील विक्रम दादासाहेब बागल पाटील या शेतकऱ्याने सुमारे तीस लाख रुपयांचे बँकेचे कर्ज काढून द्राक्षाची बाग फुलवली होती. द्राक्ष निर्यातीसाठी सज्ज होती. मात्र अचानक कोसळलेल्या गारपीट व पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. गुलाबराव बागल, मधुकर बागल, किरण कुलकर्णी, हनुमंत गुरव, कृष्णात बागल, विपुल बागल, वैभव बागल तसेच शिंगाडवाडी येथील सचिन शिंगाडे आदी छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे.
काँग्रसचे व शेतकरी संघटनेचे नेते रणजित देशमुख यांनी घटनास्थळी भेट देवून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी तातडीने संबंधित अधिकारी वर्गाला सूचना करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणतेही कागदी घोडे न नाचवता त्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी केली.
माजी सरपंच कृष्णाराव बनसोडे, किशोर बागल, दत्ता केंगारे व अनेक ग्रामस्थ सध्या शेतकऱ्यांना भेटून दिलासा देत आहेत. वरिष्ठ कृषी अधिकारी भाग्यश्री प्रमोद फरांदे, खटाव तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर, गाव कामगार तलाठी शिल्पा गोरे, कृषी सहाय्यक सिकंदर जगताप, ग्रामसेवक काशीद तसेच इतर शासकीय यंत्रणा अशा भर पावसात व सुट्टीच्या दिवशीही पंचनामा करत आहेत.