अक्षय टेमगिरे

शिक्रापूर: शिक्रापूर शहरातील व्यापाऱ्यांना सुरक्षित भयमुक्त आणि कायद्याचे संरक्षण असलेले वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने व्यापारी असोसिएशन व विविध व्यावसायिकांची समन्वय बैठक बुधवारी दि. ८ आयोजित करण्यात आली होती. बैठकीत व्यापाऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेत त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन शिक्रापूर पोलिसांनी दिले आहे.

बैठकीत शहरातील बेकायदेशीर पार्किंग, फुटपाथवरील अतिक्रमणे, रस्त्यात उभ्या राहणाऱ्या रिक्षा व इतर वाहने, भाजी विक्रेते, विरुद्ध दिशेने येणारी वाहने, मोठ्या आवाजाचे सायलेंसर, अनधिकृत गतिरोधक, कंपन्यांच्या बसथांब्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, विनापरवाना लावलेले फ्लेक्स बोर्ड, अनधिकृत लाईट खांब, पानटपऱ्या आणि वाहतूक कोंडी अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यापाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोणतीही व्यक्ती दादागिरी करत असेल खंडणी अथवा पैशांची मागणी करत असेल धमक्या देत असेल किंवा बेकायदेशीर दबाव टाकत असेल तर त्याची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.
परिसरातील चोऱ्या रोखण्यासाठी नियमित पोलीस गस्त वाढविणे, वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे, अपघात टाळण्यासाठी नियोजन करणे तसेच व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व मदत २४ तास उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाहीही बैठकीत देण्यात आली.
कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा बेकायदेशीर प्रकार आढळल्यास विलंब न करता पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ सासवडे, संभाजी मांढरे यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांनी वाहतूक, अतिक्रमण, पार्किंग व इतर स्थानिक समस्यांबाबत आपली मते मांडली. पोलीस निरीक्षक यादव यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक व्यापाऱ्यांना देत, समस्या फोन किंवा संदेशाद्वारे कळवाव्यात तसेच त्यांचा नियमित पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले असून.
या बैठकीत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गोपनीय अंमलदार संदीप कारंडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ सासवडे, संभाजी मांढरे, भाजपा नेते पंढाभाऊ गायकवाड, निलेश राऊत, शरद टेमगिरे, प्रकाश चव्हाण, अतुल पानमंत, अंकुश घारे यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.
बैठकीतील सकारात्मक भूमिकेचे व्यापाऱ्यांनी स्वागत करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले. व्यापारी व पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी अशा बैठका नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.






