लोणी काळभोर, (पुणे) : तरडे (ता. हवेली) ग्रामपंचायतीने वतनामधील जागेवर अंगणवाडी बांधकामाच्या नोंदी केल्याच्या रागातून एका तरुणाने सरपंचाना शिवीगाळ करून ग्रामपंचायतीच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. ०७) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
सिद्धार्थ बजरंग गायकवाड, (ता. तरडे, ता. हवेली) असे नुकसान करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सरपंच अभिषेक प्रभाकर दाभाडे (वय -२४, रा. सदर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. ०७) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गावातील इसम सिद्धार्थ गायकवाड याने वतनामधील जागेवर ग्रामपंचायतीमार्फत अंगणवाडीच्या बांधकामाच्या नोंदी केल्याचा राग मनात धरून गायकवाड याने सरपंच दाभाडे यांना शिवीगाळ केली व ग्रामपंचायतीवर दगडफेक केली. यावेळी तरडे ग्रामपंचायत कार्यालयाच्या शासकीय इमातीच्या समोरील काचा फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.