पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील बारामती (३५) लोकसभा मतदार संघाची मतदान प्रकीया उद्या मंगळवारी (ता. 06) पार पडत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, सासवड, भोर तसेच खडकवासला विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. सदर निवडणूकीची मतदान प्रकीया पारदर्शक, भयमुक्त व निष्पक्षपणे पार पाडणे, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे याकरीता पुणे ग्रामीण पोलीस दल पुर्णतः सज्ज आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
सर्वसामान्य नागरिकांना भयमुक्त वातावरणात मतदानाचा अधिकार बजावण्याकरीता पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे २२५ पोलीस अधिकारी त्यामध्ये २ अपर पोलीस अधीक्षक, ८ पोलीस उपअधीक्षक त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.
दरम्यान, २ हजार ९५३ पोलीस अंमलदार १ हजार ६०० होमगार्ड तसेच त्यांचे मदतीला निमलष्करी दलाच्या ९ कंपण्या पुर्णतः सज्ज आहेत. सदरची मतदान प्रक्रीया शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी व दक्षता घेण्यात येत आहे.