उरुळी कांचन, (पुणे) : जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, ध्येय नक्कीच गाठता येते. हेच उरुळी कांचन (ता. हवेली) येथील तलाठी दुर्गादास शेळकंदे यांचे चिरंजीव रोहित यांनी सिद्ध करून दाखविले आहे. रोहितने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे उरुळी कांचन सह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणीक, शासकीय क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने तहसीलदार पदाची परीक्षा सन २०२२ साली घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत रोहित शेळकंदे यांनी घवघवीत यश संपादन करुन तहसिलदार पदाला गवसणी घातली आहे. रोहितचे वडील दुर्गादास शेळकंदे हे अनेक वर्षे तलाठी म्हणून कार्यरत होते. आता ते मंडल आधिकारी पदावर कार्यरत आहेत. तलाठ्याचा मुलगा थेट तहसीलदार होणे ही गोष्ट तशी दुर्मीळच म्हणावी लागेल.
रोहितचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर रोहितने पुढील इंजिनिअरचे शिक्षण पुण्यातून घेतले. रोहित हा माहिती व तंत्रज्ञानातील (E&TC) इंजिनिअर आहे. तर रोहित शेळकंदे हा मुळ जुन्नर तालुक्यातील आहे. मात्र रोहितने लहानपणी पाहिलेले स्वप्न त्याला झोपू देत नव्हते. त्यामुळे त्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केला.
रोहितला स्पर्धा परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात अपयश आले होते. मात्र त्याने खचून न जाता पुन्हा जोरदार अभ्यास केला आणि सन २०२२ ची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तहसीलदार पदाची परीक्षा दिली. ही परीक्षा पास होऊन समाजासाठी एक आदर्श निर्माण केला आहे. रोहीतेने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दरम्यान, आयुष्यभर ज्या पदावर आपल्या वडिलांनी काम केले त्यांच्यापेक्षा वरिष्ठ पदापासून सुरुवात करत हे भाग्य लाभले आहे. तर ज्या वरिष्ठांच्या धाकात नोकरी करण्यात आयुष्य गेले. त्या पदावर आपल्या मुलाला काम करताना पाहून या माता-पित्यांची मान नक्कीच उंचावणार आहे. तलाठ्याने तहसीलदाराचा ‘बाप’ होणं हे भाग्य या मुलांमुळे या पित्याला लाभले आहे.
”या यशाचे खरे मानकरी माझे आई-वडील आहेत. ग्रामीण भाग असतानासुद्धा त्यांनी मला नेहमी मार्गदर्शन केले. त्यामुळे हे यश मी त्यांना समर्पित करतो. स्पर्धा परीक्षाकडे येणाऱ्या नवीन उमेदवारांनी संपूर्ण विचार करूनच या क्षेत्राकडे यावं, वाढती स्पर्धा आणि दिवसेंदवस कमी होणारी पदे यामुळें या परीक्षेमध्ये यश मिळवणं कठीण होत चालंल आहे. मात्र तुमची खरच तयारी असेल तर अपयश आले तर खचून जाऊ नये, अभ्यासात सातत्य ठेवा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल”.
रोहित शेळकंदे, (तहसीलदार परीक्षा उत्तीर्ण)