भोर : भोर-शिंद रस्ता ते गवडी गावापर्यंतच्या रस्त्याचे काम न करता परस्पर पैसे काढुन घेतल्याने सदरचा रस्ता चोरीला गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली असल्याची माहिती पञकार परिषदेत दिली. यावेळी माजी सरपंच एकनाथ शिळीमकर आणि निखिल राजेशिर्के, बाप्पा साळुंके, चंद्रकांत कुमकर, दिलीप साळुंके, सुदाम साळुंके तसेच ग्रामस्थ मंडळ गवडी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे कि, गवडी येथील गवडी ते प्रजिमा १४२ मार्ग सा.क्र. ० ते १(ग्रामा ४४) या रस्त्याचे कामकाज करण्याबाबत निविधा शासनाने केली असता. (४/०१/२०२२) हे काम रक्कम १३,३३,०५७ इतक्या रूपयाचे होते. या कामासाठी ठेकेदार म्हणून गवडी ग्रामपंचायत आहेत. मात्र, सद्य परिस्थिती पाहता गवडी ते प्रजिमा १४२ मार्ग सा.क्र. ० ते १ (ग्रामा ४४) या रस्त्याचे कामच झाले नाही.
मात्र, या कामाचे ठेकेदार ग्रामपंचायत गवडी आणि विद्यमान सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी बांधकाम विभाग यांच्याशी संगणमताने रस्त्याचे काम न करता रक्कम १३,३३,०५७ रुपये हडप केले असुन १४ लाखांचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी गवडी येथील सरपंच आणि सदस्यांनी राजीनामा देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, बांधकाम विभागाकडुन कामाची पाहणी करुन १५ दिवस झाले तरी अद्याप अहवाल दिलेला नसुन प्रशासन कारवाई करण्यास टाळटाळ करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
गवडी गावात जाणाऱ्या रस्त्याबाबत विरोधकांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. आम्ही कोणतेही काम न करता निधी घेतलेला नाही. त्या कामाची वर्क ऑर्डर व अंदाज पत्रक ग्रामपंचायतीचा ठराव आहे. जी पी एस लोकेशन मधील काम केल्याचे फोटो आहेत. विरोधकांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत.
काशिनाथ साळुंखे, सरपंच-गवडी
गवडी येथील रस्त्याच्या कामाबबत ग्रामस्थांचे निवेदन आले आहे. सदर रस्त्याचे स्थळ पाहणी करण्याच्या सुचना बांधकाम विभागाला दिल्या असुन कामाचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.
किरणकुमार धनावडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती-भोर