विशाल शिंदे

भोर : राज्य शासनाच्या ‘महाराजस्व अभियान’ अंतर्गत भोर तालुक्यातील माळेगाव येथे महसूल विभागाच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भोर व राजगड तालुक्यातील अनेक नागरिकांनी शिबिरात उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा व सेवांचा लाभ घेतला.

या विशेष शिबिराचे आयोजन नागरिकांच्या महसूलविषयक तक्रारी, अर्ज तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी दिवसभर उपस्थित राहून नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यावर तत्काळ कार्यवाही करत होते.

शिबिरामध्ये नागरिकांना उत्पन्न, रहिवासी, जात, ज्येष्ठ नागरिक, विविध महसुली दाखले तसेच इतर आवश्यक कागदपत्रांचे वितरण करण्यात आले. अनेक लाभार्थ्यांना जागेवरच आवश्यक दाखले देण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी महसूल विभागाबरोबरच कृषी, महावितरण, आरोग्य, ग्रामविकास तसेच शासनाच्या एकूण १५ महत्त्वाच्या विभागांच्या सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. विविध योजनांची माहिती, अर्ज स्वीकारणे, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, तक्रारींचे निराकरण आणि आवश्यक मार्गदर्शन अशी कामे एकाच छताखाली करण्यात आली. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि आर्थिक खर्च दोन्हीची मोठी बचत झाली.
विशेष म्हणजे, महसूलविषयक प्रलंबित प्रकरणांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहिले. नागरिकांच्या अडचणी ऐकून अनेक प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला, तर उर्वरित प्रकरणांबाबत निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.
उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली भोर तालुक्यातील विविध मंडळांतील गावांतील नागरिकांसाठी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शिबिराला भोर आणि राजगड तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. विविध शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी दिसून आली. अनेक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा प्रकारची शिबिरे ग्रामीण भागात नियमितपणे आयोजित करण्याची मागणी केली.
महसूल प्रशासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होत असल्याचे चित्र माळेगाव येथे पाहायला मिळाले.







