विशाल शिंदे

राजगड : पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील करंजावणे गावात स्मशानभूमी नसल्याने एका मृत व्यक्तीवर भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाईक आणि ग्रामस्थांवर आली. मुसळधार पाऊस, चिखल आणि अपुऱ्या सुविधांमुळे अंत्यविधी करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. या घटनेचा मन सुन्न करणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावात सुसज्ज स्मशानभूमी नसल्यामुळे मृत व्यक्तीवर उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागले. त्यातच मुसळधार पाऊस सुरू असल्याने अंत्यविधीसाठी जमा केलेली लाकडे भिजली होती. त्यामुळे ती पेट घेण्यास वारंवार अडचणी निर्माण झाल्या. अंत्यसंस्कार पूर्ण करण्यासाठी नातेवाईक आणि ग्रामस्थांना पावसात भिजत मोठी कसरत करावी लागली.
स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी सर्व ऋतूंमध्ये वापरता येईल असा रस्ता नसल्याने चिखल तुडवत मृतदेह नेण्याची वेळ आली. अंत्यसंस्काराच्या वेळी ना शेड, ना बसण्याची व्यवस्था, ना पिण्याच्या पाण्याची सुविधा, ना वीज अशी अत्यंत मूलभूत सुविधांचीही कमतरता असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे दुःखाच्या प्रसंगीही नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
“जिवंतपणी अनेक संकटांचा सामना करणाऱ्या नागरिकांना मृत्यूनंतरही सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक सुविधा मिळत नाहीत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटून गेली तरी गावात सुसज्ज स्मशानभूमीसारखी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेली अनेक वर्षे गावासाठी स्मशानभूमीची मागणी सातत्याने केली जात आहे. याबाबत संबंधित प्रशासन, ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय झालेला नाही. परिणामी प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना अशाच अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
करंजावणे गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे सुसज्ज स्मशानभूमी, अंत्यसंस्कारासाठी संरक्षक शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीजपुरवठा, बसण्याची सुविधा तसेच सर्व ऋतूंमध्ये वापरता येईल असा पक्का रस्ता तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अंत्यसंस्कारासारख्या संवेदनशील प्रसंगी नागरिकांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी प्रशासनाने त्वरित निधी मंजूर करून काम हाती घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. करंजावणे गावातील या घटनेनंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे किती गांभीर्याने लक्ष देतात, याकडे संपूर्ण राजगड तालुक्याचे लक्ष लागले आहे.







