बारामती : नुकताच बिग बॉस मराठीचा फिनाले पार पडला आहे. या बिग बॉस ५ च्या सीजनमध्ये सूरज चव्हाण हा विजयी ठरला आहे. त्याचे अभिनंदन करण्यासाठी अनेकांनी ठिकठिकाणी मोठी गर्दी केली होती. अशा गर्दीमध्येच सूरजच्या नातेवाईकांना तसेच भेटण्यासाठी आलेल्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी बारामती तालुक्यातील मोढवे येथे घडली आहे.
या प्रकरणी राहूल कांतिलाल बोराडे (रा. रांजणगाव, ता. शिरुर) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम सदाशिव खोमणे, शुभम तुकाराम खोमणे, गौरव धोंडीबा खोमणे आणि ऋषिकेश वैभव नानावटे (रा. मुर्टी, ता. बारामती ) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बिग बॉस मराठी ५ सिजनचा फिनाले पार पडला. त्यामध्ये सूरज चव्हाण विजयी ठरला. सूरजचे फॅन फॉलोइंग मोठ्या प्रमाणात आहेत. या शोमध्ये सुरज जिंकण्यासाठी लाखो चाहत्यांनी सपोर्ट केला होता. १६ स्पर्धकांना मात देऊन सूरज मराठी बिग बॉस सीजन ५ चा विजेता ठरला आहे. त्याला बिग बॉसची ट्रॉफी मिळाली तसेच राज्यभरात त्याचं मोठं कौतुक झालं. त्याचे अभिनंदन करण्यासाठी अनेकांनी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
तसेच सूरजला भेटण्यासाठी त्याचे नातेवाईक आणि चाहते मोढवे येथील घरी आले होते. यावेळी फिर्यादीचा भाऊ संजय कांतिलाल बोराडे, अजय खलसे, अविष्कार खोमणे, आदिनाथ बोडरे हे देखील आले होते. रात्री सर्व नातेवाईक मरिमाता मंदिरासमोर गप्पा मारत बसले असताना दुचाकीवरून चौघे आले. त्यांनी तुम्ही सूरज चव्हाणला भेटण्यासाठी का आला? असा सवाल करत एकाने लाकडी दांडक्याने मारहाण केली.
त्यामुळे फिर्यादी खाली पडले. त्यानंतर दुसऱ्याने लाकडी रॉडने डाव्या पायावर, मांडीवर मारहाण केली. तर इतर दोघे लाथाबुक्यांनी मारहाण करत होते. या घटनेनंतर मारहाण करणारे आरोपी तेथून निघून गेले. सध्या फिर्यादी यांना जेजुरी येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करीत आहेत.